रखडलेल्या तलाठी भरतीचा लवकरच निर्णय
Talathi recruitment decision soon
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध प्रवर्गांतील रिक्त झालेल्या तलाठी संवर्गातील पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, त्यांचे निकाल लावले नव्हते तसेच पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्तीपत्र दिले नव्हते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारणार्या या उमेदवारांना आता दिलासा मिळाला असून जिल्हाधिकारी यांनी तत्काळ हा विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
विविध राखीव प्रवर्गांतील तलाठ्यांच्या जवळपास 80 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये त्यांची लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचे अंतिम निकाल आणि नियुक्तीपत्रे राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भरती प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण झाली होती. गुणानुक्रमाने यादी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीपत्र कोणालाच मिळाले नाही. त्यामुळे भावी तलाठ्यांना मोठी चिंता लागून राहिली होती. इतर जिल्ह्यांतही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. त्याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी रूजू होताच तात्काळ दखल घेतली असून संबंधित अधिकार्यांना हा विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभागाचे श्रीकांत पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांशी सविस्तर चर्चा करुन येत्या आठ ते दहा दिवसांत हा विषय निकाली काढू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या भाऊसाहेबांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
सोर्स : पुढारी