तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर अन्याय!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकांची नेमणूक करीत दर महिन्याला वेतन देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मात्र, अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वर्षातून दोनदाच एकत्रितपणे पगार देण्यात येत असल्याने प्राध्यापकांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारने तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार 14 नोव्हेंबर 2018 मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत शासन आदेश काढला होता. त्यात नवी नियमावली दिली आहे. त्यानुसार तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांना आता प्रतितासिका सहाशे रुपये एवढे मानधन मिळणार होते. उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर यांच्या या निर्णयामुळे सेट, नेट, पीएचडीधारक आणि तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या आंदोलनाला यश मिळाले अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना जुन्याच दराने वेतन देत सरकारच्या आदेशाला धुडकावून लावले असा आरोपही प्राध्यापक करीत आहेत.
विद्यापीठ परिसरातील अनेक विभागांमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक काम करतात. अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने तासिका तत्त्वावर काम सुरू आहे. मात्र, या प्राध्यापकांना नियमितपणे वेतनही दिले जात नाही. अनेक विभागांचे लिपीक हे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे बिलच तयार करीत नसल्याने हा घोळ होत आहे. यामुळे प्राध्यापकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही.
या सर्व गोष्टींसाठी सरकार जबाबदार आहे. इतकी वर्ष झाली तरी तुम्ही भरती का नाही काढत. CHB करण्यास कोणी उतुस्क नाही कारण वेळेवर पगार नाही आणि मुलांमध्ये CHB शिक्षका बद्दल आदर नाही. म्हणून तज्ज्ञ शिक्षक CHB स्वीकारत नाही परिणामी शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे