Pavitra Portal Shikshak Bharti 2026
२०१८-१९ मधील गाजलेल्या टीईटी घोटाळ्याची छाया आता २०२५-२६च्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवर पडली आहे. या घोटाळ्यातील १३ उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी अर्ज केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित १३ जणांची नावे पडताळणीसाठी सायबर क्राईम, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.सायबर क्राईमकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या उमेदवारांना शिक्षक पदावर नियुक्ती द्यायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सायबरच्या अहवालाकडे प्रशासनासह जिल्ह्यातील शिक्षक भरतीच्या इच्छुकांचेही लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ४७८ शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत टीईटी घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पवित्र पोर्टलमार्फत झालेल्या या भरतीमध्ये तीन टप्प्यांत कागदपत्र पडताळणी करण्यात आली. यामध्ये ४५७ उमेदवार उपस्थित राहिले, तर २१ उमेदवार गैरहजर राहिले. मात्र, कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊनही अद्याप समुपदेशनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही.दरम्यान, या ४७८ उमेदवारांपैकी १३ जण २०१८-१९ मधील टीईटी घोटाळ्यातील संशयित असल्याची बाब समोर आली आहे. हे १३ उमेदवार पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्यांपैकी आहेत की उपस्थित राहिलेल्यांपैकी, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित १३ उमेदवारांची नावे सायबर क्राईम विभागाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली आहेत. सायबर क्राईमकडून प्राप्त होणारा अहवाल पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रत्नागिरीतील शिक्षक भरती प्रक्रियेत टीईटी घोटाळ्यातील संशयित उमेदवारांचा मुद्दा यापूर्वीही समोर आला होता. जून २०२४मध्ये १,०१६ उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. या प्रक्रियेत २६ उमेदवार गैरहजर राहिले होते. त्यावेळी टीईटी घोटाळ्यात सहभागी शिक्षक उमेदवारांची मोठी चर्चा झाली होती. रत्नागिरीत शिक्षक पदासाठी आलेल्या ९ उमेदवारांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचे समोर आल्याने त्यांना नियुक्ती नाकारण्यात आली होती. हे सर्व उमेदवार परजिल्ह्यातील होते.
टीईटी घोटाळ्यात सहभागी असलेल्या उमेदवारांवर पुणे सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत संशयित उमेदवारांची माहिती समोर आली, तर जिल्हा परिषद प्रशासनाकडून तातडीने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधून संबंधितांची पडताळणी केली जाते. आता रत्नागिरीतील या १३ उमेदवारांच्या प्रकरणात सायबर क्राईमच्या अहवालातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि त्यानंतर नियुक्तीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

४५७ उमेदवारांचे समुपदेशन लांबले
४७८ जागांसाठी ४५७ उमेदवारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. २१ गैरहजर आहेत. पडताळणी होऊन १० दिवस उलटले तरी समुपदेशन झाले नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पुढील आठवड्यात समुपदेशन होणार असून ई-मेलद्वारे कळवले जाणार आहे.
पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यासाठी निवड झालेल्या ३४९ उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेला आता अंतिम टप्प्यात वेग आला आहे. यापैकी तब्बल ३३२ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असून, या नवनियुक्त शिक्षणसेवकांना शाळा वाटप करण्यासाठी गुरुवारी (ता. १७) समुपदेशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.जवाहरलाल नेहरू वसतिगृह येथे होणाऱ्या या समुपदेशन प्रक्रियेत पात्र उमेदवारांना तालुका, गाव आणि शाळानिहाय नियुक्तीचे ठिकाण निश्चित करून दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात भरून निघणार असून, पुढील आठवड्यापासून नव्या शिक्षकांच्या सेवेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
१७ उमेदवारांची निवड रद्द; ३३२ शिक्षणसेवकांच्या शाळा वाटपाचा मार्ग मोकळा.पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यासाठी निवड झालेल्या ३४९ उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेत आता महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यापैकी १७ उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या दोन्ही संधी गमावल्याने त्यांची निवड व नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित ३३२ मराठी माध्यमाच्या शिक्षणसेवकांच्या शाळा वाटपाची प्रक्रिया १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या समुपदेशनातून पार पडणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची २ व ३ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, उर्वरित ३३२ शिक्षणसेवकांसाठी १७ सप्टेंबर रोजी समुपदेशन प्रक्रिया घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्वप्रथम दिव्यांग उमेदवारांना, त्यानंतर महिला उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांना उपलब्ध शाळांमधून आपल्या पसंतीचे नियुक्तीचे ठिकाण निवडण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आता आणखी एक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने काही शिक्षक पदे अद्याप रिक्त राहिली असून, कन्व्हर्ट राउंडमधून सुमारे १५० ते १६० रिक्त जागा भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षक भरतीचा पुढील टप्पा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद शाळांसोबतच जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या खासगी प्राथमिक शाळा, नगरपालिका, महापालिका तसेच अन्य विभागांतील शिक्षक पदांचाही समावेश आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबरोबरच शाळांमधील अध्यापन व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

मेळघाटातील शैक्षणिक क्षेत्राला मिळाले नवे बळ! पवित्र पोर्टलअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मेळघाट पेसा क्षेत्रातील मराठी माध्यम तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील उर्दू माध्यमासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापना देण्यात आली. या प्रक्रियेत एकूण १९० नवीन शिक्षक सेवकांना नियुक्ती व पदस्थापना आदेश देण्यात आले. संबंधित नियुक्ती आदेश १० सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आल्याने नव्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, मेळघाटसह संबंधित भागातील शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेतून १९० उमेदवारांच्या शिक्षक सेवेला मिळाला प्रारंभ! जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली गुरुवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शिक्षक भरतीची समुपदेशन प्रक्रिया उत्साहात पार पडली. एकूण १९१ उमेदवारांपैकी १९० उमेदवार उपस्थित होते. उपस्थित पात्र उमेदवारांना नियमानुसार समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली. विशेष म्हणजे, याच वेळी सीईओ सत्यम गांधी यांच्या हस्ते संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेशही प्रदान करण्यात आले. दरम्यान, एक उमेदवार प्रक्रियेस अनुपस्थित राहिला, तर दोन उमेदवारांनी नियुक्तीस नकार दिला.
पारदर्शक समुपदेशनाचा आदर्श; मेळघाटातील शेवटच्या उमेदवारालाही मेळघाटातच मिळाली पदस्थापना! पवित्र पोर्टलअंतर्गत झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत मेळघाट पेसा क्षेत्रातील इयत्ता १ ते ५ साठीच्या ५४ पैकी ५३ उमेदवारांनी, इयत्ता ६ ते ८ गणित-विज्ञान विषयासाठीचे ७७ पैकी ७७ आणि भाषा विषयासाठीचे ३० पैकी ३० उमेदवारांनी उपस्थित राहून पदस्थापना स्वीकारली. तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ते ५ मधील १९ आणि इयत्ता ६ ते ८ मधील विविध विषयांच्या ११ उमेदवारांचीही शंभर टक्के उपस्थिती राहिली.
या संपूर्ण प्रक्रियेतील विशेष बाब म्हणजे मेळघाट पेसा क्षेत्रातील इयत्ता १ ते ५ मधील शेवटच्या उमेदवारालाही मेळघाट क्षेत्रातच समुपदेशनाद्वारे पदस्थापना मिळाली. त्यामुळे पवित्र पोर्टलअंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेत पारदर्शकता, नियमानुसार कार्यवाही आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळाल्याचे अधोरेखित झाले. समुपदेशन प्रक्रियेवेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, उपशिक्षणाधिकारी सतीश मुगल तसेच अधीक्षक नरेंद्र गायकवाड उपस्थित होते. पवित्र पोर्टल पदभरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहायक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, विजय कविटकर, वरिष्ठ सहायक विजय राऊत, राहुल काळमेघ, विजय मालोकार, नीलेश दहातोंडे, विलास मेंदुकर, सुदर्शन भोसले, कनिष्ठ सहाय्यक विशाल कुळसंगे, अनिकेत हुरडे, संगणक परिचालक अतुल देशमुख, श्याम देशमुख, युसुफ शहा, गायकवाड आदींनी मोलाचे सहकार्य केले.

जालना जिल्ह्यातील काशीविश्वेश्वर शिक्षण प्रसा-रक मंडळामार्फत पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. संस्थेचे मूळ विश्वस्त रमेश बालाजी मुळे यांनी या जाहिरातीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षक भरतीची जाहिरात संस्थेच्या अधिकृत विश्वस्तामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र, जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या संबंधित व्यक्तींचा संस्थेशी अधिकृत संबंध नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जालना यांच्याकडे तक्र ार दाखल केली होती. मात्र, तक्रारीनंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. ए. पी. गुंगे पाटील आणि अॅड. वैभव तुकाराम पाटील आमले यांनी बाजू मांडली. त्यांनी मांडलेल्या कायदेशीर बाबी आणि उपलब्ध परिस्थितीचा विचार करून खंडपीठाने पवित्र पोर्टलवरील सदर शिक्षक भरतीच्या जाहिरातीला स्थगिती दिली. तसेच संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणात अॅड. नवनाथ पाटील सिंनगारे आणि अॅड. सचिन गजवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
Pavitra Portal Shikshak Bharti 2026:पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्हा परिषदेला मोठे शिक्षकबळ मिळाले आहे. एकूण ५०० पदांपैकी ३४९ प्राथमिक शिक्षक, तर जिल्हा परिषदेच्या माढा हायस्कूलसाठी ८ माध्यमिक शिक्षक, अशा एकूण ३५७ शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.
पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या ३५७ शिक्षकांच्या पदस्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या दोन दिवसांत या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून रिक्त पदांचा अहवाल प्राप्त होताच समुपदेशनाच्या माध्यमातून नव्या शिक्षकांना लवकरच पदस्थापना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता महत्त्वाचा ठरणार असून, मराठी माध्यमातील रिक्त पदांसह कन्नड आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेने मराठी माध्यमासाठी ५०० शिक्षकांची मागणी केली होती. मात्र, कन्नड व उर्दू माध्यमाचे रोस्टर अपूर्ण असल्याने पहिल्या टप्प्यात या दोन्ही माध्यमांतील प्राथमिक शिक्षकांची भरती झाली नाही. सध्या दोन्ही माध्यमांच्या रोस्टरचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मराठी माध्यमातील उर्वरित जागांसह कन्नड व उर्दू माध्यमातील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यात भरली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासगी प्राथमिक शाळांमधील ८० शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांचे सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे ६६, कन्नड माध्यमाचे ८ आणि उर्दू माध्यमाच्या ६ शिक्षकांचा समावेश आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026:शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला असून, ‘पवित्र’ संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलाखतीसह होणाऱ्या भरतीतील तब्बल १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या शिफारसीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या भरतीचा पहिला टप्पा सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन असून, त्यानंतर ऑक्टोबरपासून भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात सुमारे पाच हजार नवीन पदे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला आता ठोस वेळापत्रकाची चौकट मिळाली असून, मुलाखतीसह निवड प्रक्रिया अवघ्या ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार या कालावधीत पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यापासून ते प्रत्येक उमेदवाराला तीन ठिकाणी मुलाखतीची संधी देणे, निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे आणि नियुक्तीनंतर रुजू न झालेल्यांच्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करणे, अशा विविध टप्प्यांतून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असली, तरी काही प्रवर्गांतील पदे अद्याप रिक्तच राहिली आहेत. मुलाखतीशिवाय होणाऱ्या भरतीतील एकूण १९ हजार ७५४ पदांपैकी आतापर्यंत १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या भरतीत जिल्हा परिषद, महापालिका, आदिवासी विकास विभाग तसेच खासगी शाळांमधील पदांचा समावेश होता. मात्र, माजी सैनिक आणि अंशकालीन या समांतर आरक्षणातील अनुक्रमे २ हजार ७६० आणि १ हजार ७६० जागांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे अद्याप रिक्त आहेत.
रिक्त पदांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात होणार
पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच शिक्षक पदांच्या दुसऱ्या टप्प्याची तयारीही शिक्षण विभागाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बिंदूनामावली पूर्ण न झालेल्या खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांना आता दुसऱ्या टप्प्यात संधी मिळणार आहे. यासोबतच कनिष्ठ महाविद्यालये, काही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमधील उर्वरित रिक्त पदेही या टप्प्यात भरली जाणार असल्याने शिक्षक भरतीचा आवाका आणखी वाढणार आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026: मित्रांनो, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेबाबत एक नवीन अपडेट आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे पार पडलेल्या या भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांच्या एकूण १९ हजार ७५४ पदांपैकी १३ हजार १२९ उमेदवारांची विविध पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या मुलाखतीशिवाय निवड प्रकाराची गुणवत्ता यादी गुरुवारी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उर्वरित रिक्त पदांसाठी लवकरच ‘कन्व्हर्जन राउंड’ (समांतर आरक्षण रूपांतरण फेरी) राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शाळा व्यवस्थापनांनी दिलेल्या जाहिरातीनुसार ३० हजार २०९ पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले होते.
शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुण – शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मधील गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही ऑनलाइन चाचणी २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका नगरपरिषद, १३०६, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन, खासगी अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीविना निवड या प्रकारासाठी एकूण १९ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १३ हजार ११९ जागांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ७,५४१, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ४,२०७, नववी ते दहावी या वर्गासाठी १,११९, अकरावी ते बारावी या वर्गासाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
आरक्षित रिक्त पदांसाठी ‘कन्व्हर्टेड राउंड’
- समांतर आरक्षणातील पात्र १ उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे माजी सैनिक प्रवर्गातील २ हजार ७६० आणि अंशकालीन प्रवर्गातील १ हजार ७६० पदे रिक्त राहिली आहेत.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ ॐ तसेच पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १ हजार ४०८ पदेही रिक्त राहिली आहेत. ही पदे भरण्यासाठी पुढील टप्प्यात ‘कन्व्हर्टेड राउंड’ घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालाभोवती गोंधळाचे आणि गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हजारो उमेदवारांच्या शिक्षक भरती प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदावर नियुक्त्या दिल्या जात असताना, निकाल प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी पूर्ण होईपर्यंत भरतीच्या याद्या जाहीर करू नयेत, अशी जोरदार मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया नेमकी कशी होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकाल प्रक्रियेवरून उमेदवारांच्या शंकांना आता अधिक गंभीर स्वरूप आले आहे. निकालातील कथित अनियमिततेबाबत परीक्षार्थींनी परीक्षा परिषदेकडे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला; मात्र त्यावर अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेची गुणयादी परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या नियमित फॉर्मेटमध्ये नसून स्वाक्षरीविना पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर ‘रुपेश पालकर’ हे ऑथर नाव नमूद आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. महेश पालकर कार्यरत होते, याकडेही परीक्षार्थींनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे निकालाच्या गुणप्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप किंवा अनधिकृत फेरफार झाला आहे का, याबाबत चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालातील कथित अनियमिततेवरून उमेदवारांच्या शंकांना आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे. कोकरुड (ता. शिराळा) येथील परीक्षार्थी विलास नांगरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२२ आणि २०२५ या दोन्ही परीक्षांमध्ये असंख्य उमेदवारांना अगदी समान गुण मिळणे हा केवळ योगायोग नसून गुण निश्चिती प्रक्रियेतील गैरप्रकाराचा संशय निर्माण करणारा मुद्दा आहे. याशिवाय निकालाच्या यादीत अनेक उमेदवारांची नावे चुकीची नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दिव्यांग उमेदवारांसोबत परीक्षेला उपस्थित असलेल्या लेखनिकांची माहिती निकालासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच उत्तरपत्रिकेसाठी उमेदवारांकडून अनधिकृतपणे ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले, मात्र उत्तरसूची देण्यास नकार देण्यात आला, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील सरकारी आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पेसा तसेच नॉन-पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून वर्ग-तीन संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत तब्बल २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार असल्याने पात्र उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची आणि रोजगाराची सुवर्णसंधी ठरणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चारही विभागांतील सरकारी आश्रमशाळांमध्ये २,४२१ शिक्षक पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ पदे, त्यानंतर ठाणे ६१३, नागपूर ५१४ आणि अमरावती विभागात ४६८ पदे भरण्यात येणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशा विविध पदांचा या भरतीत समावेश असून, मराठी व इंग्रजी माध्यमासह मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या भरतीमध्ये पेसा क्षेत्रातील ८८५ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १,५३६ पदे उपलब्ध आहेत. स्थानिक तसेच आदिवासी क्षेत्रातील पात्र उमेदवारांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रांचे स्वतंत्र विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी आश्रमशाळांमध्ये शिक्षक म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही भरती एक मोठी रोजगाराची संधी आणि महत्त्वाची सुवर्णसंधी ठरणार आहे.

पवित्र पोर्टल द्वारे राज्याला नवी शिक मिळणार आहे. या मुले हजारो उमेदवारांना रोजगार मिळणार आहेत. महाराष्ट्रातील या नवीन बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीच्या प्रक्रियेने अखेर आता वेग घेतला आहे. राज्यातील तब्बल दीड लाख उमेदवारांनी रिक्त जागांचे प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर ‘लॉक’ केले आहेत. त्यातून ३१ हजारांपेक्षा अधिक नवे शिक्षक लवकरच रुजू होण्याची शक्यता आहे. मात्र उपलब्ध जागा आणि त्या ‘लॉक’ करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण पाहता ओबीसी आणि भटक्या जमातींच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. रिक्त पदांच्या ८० टक्के प्रमाणात शिक्षक भरती करण्यासाठी राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यानुसार २०२५ च्या ‘टेट’ परीक्षेतील उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले आहेत. त्यात १ लाख ७० हजार उमेदवारांपैकी जवळपास दीड लाख उमेदवारांनी सहभाग घेतल्याची आकडेवारी पोर्टलवरच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार, ‘मुलाखतीशिवाय’ भरल्या जाणाऱ्या जागांचे तब्बल १ लाख ४६ हजार ६५० प्राधान्यक्रम उमेदवारांनी ‘लॉक’ केले आहेत. तर ‘मुलाखतीनंतर’ भरल्या जाणाऱ्या जागांचेही तब्बल १ लाख ३१ हजार ५०५ प्राधान्यक्रम भरण्यात आले आहेत. पुढच्या टप्प्यात उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या शिक्षक पदाकरिता ‘एकास एक’ अशी शिफारस होणार आहे. तर मुलाखतीसह भरल्या जाणाऱ्या पदासाठी ‘एकास तीन’ या प्रमाणात उमेदवारांची पोर्टलद्वारे शिफारस केली जाणार आहे.
अभियांत्रिकी (Engineering) आणि बीसीए (BCA) पदवीधारक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली आहे; कारण पात्र असूनही, प्रणालीद्वारे त्यांच्यासाठी ‘प्राधान्यक्रम याद्या’ (preference lists) तयार करण्यात आल्या नाहीत. या घडामोडीमुळे शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पात्र उमेदवारांसाठी त्वरित प्राधान्यक्रम याद्या तयार कराव्यात आणि त्यांना भरती प्रक्रियेत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
B.E., B.Ed., CTET आणि TET यांसारखी पात्रता असूनही, पात्र अभियांत्रिकी पदवीधरांना त्यांच्या पसंतीक्रम याद्या (preference lists) तयार करता आल्या नाहीत; कारण ‘पवित्र’ (Pavitra) भरती प्रणालीमध्ये अभियांत्रिकी पदवीच्या विषयाचा समावेश करण्यात आलेला नव्हता. २०२२ पासून आजवर राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेदरम्यान गणित विषय शिकवण्याची संधी नाकारल्यामुळे, पात्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (MSCERT) १५ डिसेंबर २०२३ रोजी शिफारस केली होती की, हे विद्यार्थी गणित विषयासाठी पात्र आहेत. या याचिकेत मागील भरती प्रक्रियेतील अशा घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे, जिथे कागदपत्र पडताळणी दरम्यान पात्र अभियांत्रिकी उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. परिणामी, या पात्र उमेदवारांना संधी नाकारली गेल्यामुळे प्रशासनाला ताकीद देण्यात आली आहे.
पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. BCA पदवी ही BCS आणि BSc-IT पदवींच्या समकक्ष मानली जाते; तरीही, गणित आणि विज्ञान विषयांच्या संदर्भात BCA पदवीधारकांना संधी नाकारण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत जून २०२४ मध्ये निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण NCTE कडे पाठवण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोल्हापूर सर्किट बेंचने पुढील सुनावणी सप्टेंबरसाठी निश्चित केली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांची बाजू ॲडव्होकेट आदित्य रत्नकाडे मांडत आहेत.

Pavitra Portal Shikshak Bharti 2026: राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पवित्र पोर्टलद्वारे तब्बल ३० हजार २०२ शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. उमेदवारांना पवित्र पोर्टलवर उपलब्ध पदांसाठी आपला पसंतीक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांची गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Pavitra Portal Preference Selection Date has been extended till 16th August 2026. Candidates can check https://mahateacherrecruitment.org.in/ website regularly.
शालेय शिक्षण भरती पद्धतीबाबत ओरड झाल्याने शासनाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा नवा पायंडा पाडला. ही नव्याने लागू भरती पद्धत पारदर्शी असल्याचा दावा शासन करते. सर्व अर्जधारकांसाठी एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 चे पसंतीक्रम जनरेट व लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आपण लॉगिन करून हि स्टेप पूर्ण करावी. यासाठी प्राधान्यक्रम लाॅक करण्यासाठी कालावधी- 06/08/2026 ते 16/08/2026 पर्यंत दिलेला आहे. या संदर्भातील माहिती आपण खालील परिपत्रकात बघू शकता .

शुध्दीपत्रकातील प्रमुख तरतुदी
इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १० वी या गटांमधील सेमी इंग्रजी वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध करताना उमेदवाराची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह संबंधित शाळांचे माध्यम (जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी) विचारात घेतले जाईल. उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, अथवा शालांत परीक्षेत जे माध्यम द्वितीय भाषा म्हणून उत्तीर्ण केले आहे, त्याच माध्यमांच्या शाळांसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाईल. इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरीता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अट निश्चित करण्यात आली आहे. मात्र संबंधित सामाजिक प्रवर्गासाठी असे इंग्रजी व्यावसायिक अर्हताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. नव्याने दिल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही परंतु ज्यांच्याकडे १२ वी विज्ञान (HSC Science) किंवा बी.ए./एम.ए. (इंग्रजी) अथवा बी.एस्सी./एम.एस्सी. अशी शैक्षणिक अर्हता आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे सेमी इंग्रजी शाळांमध्ये अर्हताधारक शिक्षकांची टंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच इंग्रजी विषय किंवा विज्ञान शाखेची पार्श्वभूमी असलेल्या अनेक बेरोजगार डी.एल.एड. व बी.एड. धारक उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेले हे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक स्पष्ट, पारदर्शक व व्यापक होण्यास मदत होणार असल्याचे मत शिक्षक संघटना व्यक्त करीत आहे.
टीईटी-२०२५च्या गुणांवर भरती
यंदाची शिक्षक भरती प्रक्रिया टीईटी-२०२५च्या गुणांच्या आधारे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. शिक्षण विभागाने उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून उपलब्ध पदांचा तपशील पाहण्याचे आणि पात्रतेनुसार योग्य पदांना पसंतीक्रम देण्याचे आवाहन केले आहे.
कुठे किती पदे?
| संस्था / विभाग | उपलब्ध पदे |
|---|---|
| जिल्हा परिषदांच्या शाळा | १३,३५२ |
| महानगरपालिकांच्या शाळा | १,९४५ |
| नगर परिषदांमधील शाळा | २८० |
| आदिवासी विकास विभाग | २,४२३ |
| शासकीय विद्यालयांमधील | ५६ |
| खासगी शैक्षणिक संस्था | १२,१४६ |
| एकूण | ३०,२०२ |
पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या ३०,२०२ पदांचे संस्थानिहाय चित्र पुढीलप्रमाणे आहे:
या भरतीमध्ये खासगी शैक्षणिक संस्थांमधील पदांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सरकारी तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
उमेदवारांनी काय करावे?
शिक्षण विभागाकडून उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून प्रथम प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर उपलब्ध पदांमधून आपल्या पात्रतेनुसार आणि पसंतीनुसार पदांचा क्रम निश्चित करावा लागणार आहे.
पसंतीक्रम निश्चित केल्यानंतर तो अंतिम करण्यासाठी ‘लॉक’ करणे आवश्यक आहे. १६ ऑगस्टनंतर पसंतीक्रम लॉक करण्याची संधी उपलब्ध राहणार नसल्याने उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पदभरतीची पुढील प्रक्रिया काय?
पसंतीक्रम लॉक झाल्यानंतर संबंधित पदांसाठी गुणवत्ता आणि पात्रतेनुसार पुढील नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानुसार नियुक्तीची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. तसेच मुलाखतीसह भरल्या जाणाऱ्या पदांसाठी संबंधित व्यवस्थापन आणि शाळांमार्फत पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या पदांची संख्या सर्वाधिक
या भरतीमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या पदांचे प्रमाण मोठे असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सर्वाधिक पदे उपलब्ध आहेत. त्यानंतर सहावी ते आठवी, नववी-दहावी आणि अकरावी-बारावीच्या स्तरावरील पदांचा समावेश आहे. यामुळे प्राथमिक शिक्षक पदासाठी पात्र असलेल्या टीईटी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
अडचणी असल्यास ई-मेलवर संपर्क
पवित्र पोर्टलवरील प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना काही अडचण किंवा समस्या असल्यास शिक्षण विभागाने दिलेल्या [email protected] या ई-मेलवर आपली समस्या कळविण्याचे आवाहन केले आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाचे मुद्दे
एकूण पदे: ३०,२०२
भरतीचे माध्यम: पवित्र पोर्टल
आधार: टीईटी-२०२५चे गुण
पसंतीक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत: १६ ऑगस्ट २०२६
भरतीमध्ये समावेश: जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये आणि खासगी शैक्षणिक संस्था
समस्यांसाठी ई-मेल: [email protected]
टीईटी-२०२५च्या गुणांवर आधारित या मोठ्या शिक्षक भरतीमुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील आपली माहिती तपासून पात्र पदांना योग्य पसंतीक्रम देणे आणि अंतिम मुदतीपूर्वी तो लॉक करणे महत्त्वाचे आहे.
राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर संस्थांना जाहिरात नोंदवण्यासाठी दिलेल्या २१ जुलैच्या मुदतीनंतर आता लाखो अभियोग्यताधारकांचे लक्ष पुढील वेळापत्रकाकडे लागले आहे. १ लाख ७० हजारांहून अधिक स्वप्रमाणित उमेदवारांना आता संस्थानिहाय रिक्त जागांचे तपशील आणि प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या तारखांची उत्सुकता आहे. शिक्षण विभागाकडून लवकरच यासंबंधीचा आढावा घेऊन पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राज्यातील शिक्षक पदभरतीकडे पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदविण्यास शिक्षण विभागाने पुन्हा एक दिवसांची २१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. यानंतर दीड लाखांहून अधिक पात्रताधारकांचे आता संस्थानिहाय रिक्त जागा, प्राधान्यक्रम नोंदणीच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.
राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने एक मेपासून संस्थांकडून जाहिराती पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली. विभागाकडून २१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु अद्याप ही प्रक्रिया अपूर्ण आहे. जाहिरातीसाठी मुदत देऊनही अनेक संस्थांच्या जाहिराती अपलोड झालेल्या नसल्याचे सांगण्यात येते. मंगळवारपर्यंत जाहिरातींची नोंदीचा आढावा घेऊन शिक्षण विभाग रिक्त जागांची स्थिती, पुढील वेळापत्रक जाहीर करील असे सांगण्यात येते. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पदभरतीची प्रक्रिया होईल, असे सांगण्यात येत होते, तसे झाले नाही. पात्रताधारकांचे प्रक्रियेतील पुढील वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे. शिक्षक पदभरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना पवित्र प्रणालीवर जाऊन ‘स्व-प्रमाणपत्र’ भरणे आवश्यक असते. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत पात्र ठरलेल्यांपैकी सुमारे एक लाख ७० हजार स्वप्रमाणित अर्ज केलेले उमेदवार आहेत.
राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’च्या संथ कारभारामुळे मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे 1,200 शिक्षकांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. नियमानुसार शिक्षकांची भरती केवळ या सर्वसमावेशक पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक असल्याने महापालिकेचे हात बांधले गेले आहेत. पालिकेने आपला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असला तरी तिथून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे पालिका शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षक भरती रखडल्याने पालिकेने ‘तासिका मानधन’ (घडय़ाळी तास) तत्त्वावर खाजगी शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती केली आहे. मात्र या कंत्राटी शिक्षकांमध्येही तीव्र असंतोष पसरला आहे. तासाला केवळ 150 इतके तुटपुंजे मानधन मिळत असल्याने ‘महागाईच्या काळात या दरात शिकवणे कसे परवडणार?’ असा संतप्त सवाल हे शिक्षक उपस्थित करत आहेत. यावर पर्याय म्हणून ‘महापालिकेने मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे, त्यानुसार शिक्षकांना दिले जाणारे मानधन वाढवण्यात येईल,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. मात्र हा प्रस्ताव कधी अमलात येणार आणि मानधनात नेमकी किती वाढ होणार, याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. पवित्र पोर्टलद्वारे नियमित भरती प्रक्रिया सुरू झाल्यास सध्या काम करत असलेल्या या कंत्राटी शिक्षकांचे काय करायचे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे. ‘‘आम्हाला 1,200 शिक्षकांची भरती तातडीने करायची आहे, पण पवित्र पोर्टलमुळे आमचे हात अडकले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच लवकरच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिली. पोर्टलच्या प्रक्रियेला वेळ लागणार असेल, तर महापालिकेला स्वतःच्या स्तरावर भरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे करणार असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती केली जाणार असून, यासाठी महापालिका शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलवर जाहिरात दाखल करण्यात आली आहे. एकूण ४४ शिक्षकांची या अंतर्गत भरती केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी सांगितले.
महपाालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये २०१९ पासून संचमान्यता तसेच बिंदूनामावलीचे काम रखडले होते. यंदा हे काम पूर्ण करीत महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी नुकतीच पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात आली आहे. या माध्यमातून माध्यमिकच्या मराठी माध्यम शाळांमध्ये १९, उर्दू माध्यम शाळांमध्ये १० शिक्षकांची भरती केली जाणार असून, प्राथमिक विभागाच्या हिंदी माध्यम शाळांमध्ये १५ विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळांचा सर्वागीण विकास उज्वल भविष्यासाठी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अशाप्रकारे या भरतीद्वारे महापालिकेच्या शाळांना ४४ नवीन शिक्षक मिळणार आहेत. महापालिकेच्या शहरात एकूण शंभर शाळा असून, त्यामध्ये ८०४ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या वर्षी या शाळांमध्ये जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा ३० जूनपर्यंत पटनोंदणी अभियान राबविले जाणार असून, त्यानंतर यंदाची विद्यार्थीसंख्या निश्चित होणार आहे.
प्राथमिक शाळांमध्ये चाळीस पदांची वाढ
यंदा महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये ४० पदे वाढली असून, ती सुद्धा भरली जाणर आहे. बी. टी. पाटील महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी असताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने आंतरजिल्हा बदलीने ५२ शिक्षक भरल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या शिक्षकांचा खटका सध्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्याचा निकाल संबंधित शिक्षकांच्या बाजूने लागल्यास, त्यांना या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. न्यायालयीन निकाल त्यांच्याविरोधात गेल्यास पुढील वर्षी या पदांच्या भरतीसाठी पुढील वर्षी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली जाणार आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















