एमपीएससीच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब (अराजपत्रित) गट क संवर्गातील (वाहनचालक वगळून) पदे सरळसेवेने  एमपीएससीमार्फत भरण्याबाबत राज्य शासनाने १८ जुलै २०२४ रोजी निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासनाच्या विविध विबागांतील गट ब (अराजपत्रित) आणि गट क या सेवेतील विविध संवर्गांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत केली जाणार आहे. या गट ब (अराजपत्रित) आणि गट क सेवेतील विविध संवर्गांची वाढणारी संख्या, त्या अनुषंगाने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ, २०२३च्या निकाल प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, न्यायालयाचे निर्णय, निकालास होणारा विलंब लक्षात घेऊन गट ब आणि गट क सेवेतील विविध संवर्गांची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.