Check MPSC Online FAQ 2026
Check MPSC FAQ 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि विविध निर्णयांबाबत उमेदवारांच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयोगाने ४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे की, उमेदवारांकडून नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे (FAQ) आता आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या नव्या सुविधेमुळे उमेदवारांना परीक्षा आणि भरती प्रक्रियेशी संबंधित पडणाऱ्या नियमित प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी सहज मिळतील. तसेच, याव्यतिरिक्त उमेदवारांच्या मनात काही अतिरिक्त प्रश्न किंवा शंका असल्यास, त्यांचेही आगामी काळात निरसन केले जाईल, असे परीक्षा नियंत्रक तथा सह सचिव सरिता बांदेकर-देशमुख यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केलेल्या या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.नवीन परीक्षा पॅटर्न PDF खाली दिलेल्या लिंक ने डाउनलोड करू शकतात व मोफत टेस्ट सिरीज साठी येथे क्लिक करा
⇒MPSC AMVI Bharti New Exam Pattern And Syllabus PDF – 461 पदांची संगणक प्रणालीवर आधारित (Computer-Based Test) परीक्षा | सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व, मुख्य परीक्षेचा पॅटर्न
MPSC Exam Latest FAQ
१. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा (CBT) म्हणजे काय ?
संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये उमेदवारांना संगणकाच्या स्क्रीनवर उपलब्ध प्रश्नपत्रिका पाहून माऊसच्या सहाय्याने उत्तर नोंदणी करता येते. सदर परीक्षा पद्धती ही संपूर्णपणे कागदविरहित असते.
२. अनेक वर्ष यशस्वीपणे OMR वर परीक्षा घेत असताना अचानकपणे संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षा घेणे का आवश्यक आहे ?
राज्य शासनातील गट-अ, गट-ब आणि गट-क मधील काही संवर्गाच्या परीक्षा आयोगामार्फत घेण्यात येत होत्या तर काही परीक्षा विविध प्रशासकीय विभागामार्फत / नियुक्ती प्राधिका-यांमार्फत/विविध संस्थांमार्फत घेण्यात येत होत्या. परंतु शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक ०२ नोव्हेंबर, २०२२ नुसार राज्यातील गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक संवर्गाच्या परीक्षा आयोगाकडे सोपविण्यात आल्या.
तद्नंतर भरतीप्रक्रिया सुसूत्रिकरण व सुधारणांसंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०५ मे, २०२६ च्या शासन निर्णयान्वये गट-अ ते गट-क या संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आली आहेत. त्यामुळे आयोगामार्फत पूर्वी घेण्यात येणा-या परीक्षांपेक्षा मोठ्या प्रमाणात आयोगाला भरतीप्रक्रिया आणि परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.
⇒Maharashtra Group C Services Exam Pattern And Syllabus-परीक्षा तीन टप्प्यांत, MPSC गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करा
वरील प्रमाणे भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयोगाला मोठ्या प्रमाणावर व वर्षभर परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. OMR पद्धतीने परीक्षा यशस्वीपणे घेण्यात येत असल्या तरी उमेदवारांची मोठी संख्या, विविध प्रशासकीय व तांत्रिक संवर्ग, परीक्षा केंद्रांबाबतची वर्षभर उपलब्धतेबाबतची मर्यादा या बाबी पाहता OMR पद्धतीने परीक्षा घेण्यास मर्यादा आहेत. त्या संदर्भातील अवलंबित्व कमी करणे, वर्षभरात घ्यावयाच्या विविध संवर्गाच्या परीक्षांमध्ये झालेली/होणारी लक्षणीय वाढ, जलद व पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी, अधिक सुरक्षित परीक्षा व्यवस्था आणि राष्ट्रीय स्तरावरील आधुनिक परीक्षा प्रणालीशी सुसंगतता राखण्यासाठी संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.
३. प्रश्नपत्रिकेतील गणिती/बुद्धीमत्ता प्रश्नांच्या कच्च्या कामासाठी (Rough Work) कागद पुरविले जातात का ?
प्रश्नपत्रिकेतील गणिती/बुद्धीमत्ता प्रश्नांच्या कच्च्या कामासाठी (Rough Work) कागद पुरविले जातात.
४. आयोगामार्फत यापूर्वी संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेण्यात आल्या आहेत का ?
होय. डिसेंबर, २०२२ पासून आजतागायत आयोगामार्फत विविध १३८ संवर्गाकरिता संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आल्या/येत आहेत.
५. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा कोण घेणार आहे ?
संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत.
६. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेसाठी तांत्रिक सहाय्य कोणाचे आहे ?
या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असल्याने त्याकरिता तांत्रिक सहाय्य विविध तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था तसेच शासकीय व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतने यांचा परीक्षा केंद्र म्हणून वापर केला जाणार आहे.
७. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा कोठे कोठे होणार आहे ?
संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा राज्यातील जिल्हास्तरावरील विविध केंद्रांवर होणार आहे.
८. Normalization म्हणजे काय ? एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केलेल्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांमधील गुणांचे समानीकरण (Normalization) केले जाते का ?
होय. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असल्याने आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाते. त्यामुळे परीक्षेच्या सर्व सत्रांतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यत्ता स्तर विचारात घेऊन उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण (Normalization) करणे आवश्यक ठरते. अशा उमेदवारांचे Normalized गुण निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येतो. Normalization पद्धत ही वैज्ञानिक व सांख्यिकीय समीकरणांवर पद्धत आहे. समानीकरण (Normalization) पद्धतीसंदर्भात सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.
९. संगणक प्रणालीवर आधारित सर्वच परीक्षांमधील गुणांचे समानीकरण (Normalization) केले जाते काय ?
ज्या परीक्षा फक्त एका सत्रातच घेतल्या जातात अशा परीक्षांकरिता गुणांचे समानीकरण (Normalization) करण्याची आवश्यकता नसते.
१०. Normalization मुळे उमेदवारांच्या गुणांवर परिणाम होतो का ?
प्रस्थापित वैज्ञानिक आणि सांख्यिकीय सूत्राच्या आधारे विविध सत्रांतील सर्व उमेदवारांच्या गुणांमध्ये समानता आणण्यासाठी Normalization करण्यात येते. त्यामुळे उमेदवारांच्या गुणवत्तेवर/मेरिटवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. उमेदवारांचे Normalized गुण विचारात घेऊनच गुणवत्ता यादी तयार केली जाते.
Download MPSC Frequently Asked Questions PDF
११. Normalization पद्धत योग्य आहे का ?
होय, Normalization पद्धत ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त वैज्ञानिक व सांख्यिकीय पद्धत आहे, सद्यस्थितीत तिचा वापर विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक प्रवेश परीक्षांकरिता देशभराशतील विविध संस्थांमार्फत केला जातो. Normalization चा उद्देश कोणत्याही उमेदवाराला फायदा किंवा तोटा देण्याचा नसून विविध सत्रांतील प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी विचारात घेऊन सर्व उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण करणे हा आहे.
१२. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये उमेदवाराचा संगणक Hack होऊ शकतो का ?
नाही, संगणक Hack होण्याची शक्यता नसते. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेसाठी वापरण्यात येणारे संगणक हे परीक्षेच्या कालावधीत संबंधित परीक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणाली व्यतिरिक्त अन्य सार्वजनिक/कोणत्याही इंटरनेटशी जोडलेले नसतात. तसेच अन्य बाह्य उपकरणे जोडण्याची सुविधा बंद केलेली असते आणि ते सुरक्षित परीक्षा प्रणालीमध्ये कार्यरत असल्यामुळे बाह्य माध्यमांद्वारे संगणक Hack होण्याची शक्यता नसते.
१३. आयोगामार्फत CBT वर आधारित एका पेक्षा अधिक सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे Normalization कोण करणार आहे व Normalization चे सूत्र काय असेल ?
Normalization ही प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत CBT वर आधारित एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी वापरण्यात येणार आहे. Normalization चे सूत्र व वापर पद्धती ही आयोगाच्या संकेतस्थळावर वेगवेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे.
१४. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचा पेपर सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्यास काय होईल ?
तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी परीक्षा प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुरक्षा व्यवस्था, बॅकअप व्यवस्था आणि त्वरित तांत्रिक सहाय्य याची प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली असते. तथापि, संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षेशदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास परीक्षा ज्या प्रश्नावर खंडित झाली होती त्याच प्रश्नापासून पुन्हा सुरू होते. तसेच, तांत्रिक बिघाडामुळे वाया गेलेल्या कालावधीतका अतिरिक्त वेळ (Compensatory Time) उमेदवाराला दिला जातो. त्यामुळे उमेदवाराचे कोणतेही नुकसान होत नाही.
१५. परीक्षेची पारदर्शकता व सुरक्षितता कशी राखली जाते ?
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन, परीक्षा केंद्रांचे नियंत्रण, परीक्षा केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही कामे आयोगामार्फत करण्यात येतात. तसेच आयोगाच्या Command and Control Centre मधून संपूर्ण परीक्षेवर देखरेख ही सर्व कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर आयोगामार्फत नियुक्त केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व समावेक्षक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवलेला असतो.
१६. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये सुरक्षेचे गंभीर धोके व पेपरफुटी होऊ शकते का ?
नाही. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचा परीक्षा सुरू होईपर्यंत एन्क्रिप्टेड (Encrypted) स्वरूपात असते आणि परीक्षा सुरू होण्याच्या वेळी त्या सत्रातील पहिल्या उमेदवाराने Login केल्यावरच ती प्रथमतः डिक्रिप्टेड (Decrypted) होते. उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी, AI आधारित निगराणी, CCTV, Live Monitoring, Mobile Jammer, Browser Lockdown, Audit Logs यांसारख्या उपायांमुळे परीक्षेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येते.
१७. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतल्यानंतर उमेदवारांना माहितीसाठी प्रश्नपत्रिका केव्हा उपलब्ध होईल ?
संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षेची एका पेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या परीक्षेची सर्व सत्रे पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका उमेदवाराच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
१८. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरिता उपस्थित उमेदवारांच्या Response Sheet कधी उपलब्ध करून दिल्या जातील ?
संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षेची एका पेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या परीक्षेची सर्व सत्रे पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराची Response Sheet उमेदवाराच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.
१९. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक सत्राची उत्तरतालिका केव्हा उपलब्ध होईल ?
संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षेची एका पेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या परीक्षेची सर्व सत्रे पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक सत्राची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
२०. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरिता उपस्थित उमेदवारांच्या Response Sheet कोणाकडे राहतील ?
एका पेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या संगणक प्रणालीवरील परीक्षेतील सर्व Response Sheets परीक्षेचे सत्र संपल्यानंतर सुरक्षितपणे तात्काळ आयोगाकडे विहित पद्धतीने सुरक्षितपणे संकलित होतील.
२१. परीक्षा केंद्रांची तांत्रिक सज्जता कशी तपासणार ?
प्रत्येक परीक्षा केंद्राचे डिजिटल सुरक्षा परीक्षण (Digital Security Audit) हे सी-डॅक (C-DAC) या शासनमान्य संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
२२. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये उमेदवारांना परीक्षेच्या कालावधीमध्ये उत्तर बदलण्याची सुविधा असते का ?
संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षेत उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर निवडल्यानंतर त्याला “Save & Next” आणि “Mark for Review & Next” हे दोन पर्याय उपलब्ध असतात. त्यानुसार उमेदवार पुढील प्रमाणे पर्याय निवडू शकतो, –
- “Save & Next” निवडल्यास त्या प्रश्नाचे उत्तर जतन (Save) होऊन उमेदवार पुढील प्रश्नाकडे जातो परंतु सदर पर्याय वापरून जतन केलेले उत्तर पुन्हा बदलता येत नाही.
- “Mark for Review & Next” निवडल्यास उत्तर जतन केले जाते, मात्र परीक्षा संपण्यापूर्वी त्या प्रश्नाकडे पुन्हा परत जाऊन आवश्यक असल्यास उत्तर बदलण्याची सुविधा उपलब्ध असते. ही सुविधा केवळ संगणक प्रणालीवर आधारित (CBT) परीक्षेत उपलब्ध असून OMR आधारित परीक्षेत उपलब्ध नसते.
२३. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेच्या सरावासाठी उमेदवारांना सुविधा उपलब्ध आहे का ?
उमेदवारांना संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेच्या सरावासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर Mock/Demo Test उपलब्ध करून देण्यात येते. सदर Mock/Demo Test उमेदवारांना Mobile वरून देखील वापरता येते.
