डी.एल.एड.ची परीक्षा लांबणीवर

D.L.Ed. Exam 2020 postponed


DLEd Exam 2020 postponed – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या जुनमध्ये घेण्यात येणारी प्राथमिक शिक्षण पदविका (डी. एल. एड.) परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने डी. एल. एड.च्या परीक्षेसाठी २९ जानेवारी २०२० रोजी प्रथम व द्वितीय वर्षातील परीक्षेचे वेळापत्रक व ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे (डायट) प्राचार्य व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य यांना कामकाजबाबत पूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. नियमित शुल्क भरुन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा अर्ज भरण्यासाठी ११ ते २३ फेब्रुवारी व अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३ ते १७ मार्च अशी मुदत अध्यापन विद्यालयांना देण्यात आली होती. ४ ते १२ जून या कालावधीत परीक्षा घेण्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले होते. परीक्षेसाठी सुमारे ७०० अध्यापक विद्यालयानी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी ३५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.

करोनाचा प्रसार वाढल्याने शाळा, महाविद्यालये मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहेत. आता लॉकडाऊन ही ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे डी.एल.एड. च्या परीक्षेबाबत काय करायचे याची डायटच्या प्राचार्यांबरोबर चर्चा करण्यासाठी परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाईन झूमचा वापर करुन मिटिंग घेण्यात आली. आधी जुलै मध्ये परीक्षा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र या कालावधीत पाऊस असतो. त्यामुळे या महिन्यात परीक्षा घेणे सोयीचे ठरणार नाही, असे म्हणणे प्राचार्यांनी मांडले. ऑगस्ट नंतरच परीक्षा घ्यावी असेही मत काही जणांकडून मांडण्यात आले आहे.

अखेर लॉकडाऊन उठल्यानंतर परिस्थिती पाहून परीक्षा कधी घ्यायच्या याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सध्या तरी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.Leave A Reply

Your email address will not be published.