या वर्षी शाळांचे निकाल एसएमएस किंवा ऑनलाईनद्वारे
Board Results 2020-2021 Online
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय बंद असल्याने शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी व इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांचा निकाल एसएमएस, दूरध्वनी व इतर ऑनलाइन पद्धतीने तात्काळ कळवावा. जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये संभ्रम राहणार नाही, अशा सूचनाच पत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्याच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करता येणे शक्य होईल त्या दृष्टीकोनातून हा निकाल तात्काळ ऑनलाइन कळवून पुढील इयत्तेत त्यांना बढती देण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे, स्थानिक लॉकडाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना निकालपत्र देण्याची आवश्यक कार्यवाही शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने करायची आहे. मात्र, यामुळे शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्षभरातील घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांची माहिती सर्व शाळांमध्ये असताना घरी बसून शिक्षकांनी निकालाची कार्यवाही कशी करायची? शिवाय संचारबंदीच्या काळात शाळांत पोहचायचे तरी कसे असे अनेक प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहेत.