महाराष्ट्रातील विविध MIDC वसाहतीतअग्निशमन दलात 55 टक्के पदे रिक्त! – Maharashtra Fire Brigade Vacancies
Maharashtra Fire Brigade Vacancies
Maharashtra Fire Brigade Vacancies – महाराष्ट्रातील विविध औद्योगिक वसाहतीमधील केमिकल झोनमधील कंपन्यांमध्ये आगी लागण्याचा मोठा धोका असतो. या कारखान्यांमधील कामगारांना खासकरून कंत्राटी कामगारांना प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामगारांना रसायने हाताळता येत नसतील तर दुर्घटनेची व्याप्ती वाढते. कामगारांची संख्या कमी असल्यामुळे एमआयडीसीमध्ये कंत्राटी कामगार मोठय़ा संख्येने आहेत. त्यामध्ये ‘अग्निशमक विमोचक’ या महत्त्वाच्या पदावर अनेक कंत्राटी कामगार आहेत.
औद्योगिक वसाहतींमधील वारंवार लागणाऱ्या आगीचे कारण शोधण्यास एमआयडीसीने सुरुवात केली होती. त्यात 60 ते 70 टक्के आगी अकुशल आणि अप्रशिक्षित कामगारांच्या निष्काळजीपणामुळे लागत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील एक कारण कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेले कामगार हेसुद्धा होते. सध्या एमआयडीसीमध्ये 815 कंत्राटी कामगार असल्याचे एमआयडीसीच्या अहवालातूनच उघड झाले आहे. आता भविष्यातील योजना मार्गी लावण्यासाठी 5 हजार 603 जागांचा सर्वसमावेशक नवीन आकृतीबंध तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अग्निशमन दलात 55 टक्के पदे रिक्त
राज्यात एमआयडीसीच्या 289 वसाहती आहेत. त्यातील 45 वसाहती मोठय़ा आहेत. मध्यंतरी एमआयडीसीमध्ये आगीच्या अनेक घटना घडल्या होत्या. एमआयडीसीची स्वतःची 32 अग्निशमन केंद्रे आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ही अग्निशमन केंद्रे सक्षम करण्याबरोबरच आणखीन किमान 45 अग्निशमन केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली होती, पण नंतरच्या सरकारमध्ये यामध्ये फार काही मोठी प्रगती झाली नाही. सध्या एमआयडीसीच्या अग्निशमन विभागात 910 मंजूर पदे आहेत, पण त्यातील 55 टक्के म्हणजे तब्बल 407 पदे रिक्त आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मोठा धोका आहे.