महाज्योतीचे उमेदवारांची १०० टक्के शिष्यवृत्तीसाठी मागणी! – Sarthi Scholarship Update News
Sarthi Scholarship Update News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची १०० टक्के रक्कम संशोधक विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. मात्र, या निर्णयामुळे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थांतील संशोधक विद्यार्थी संतप्त झाले असून, बार्टीप्रमाणेच सारथी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची शंभर टक्के रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांसाठी समान धोरण लागू करण्याचा निर्णय ३० ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आला.
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तिन्ही संस्थांच्या संशोधकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांकडे शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना सरसकट ५० टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय २५ जुलै रोजी घेतला होता. मात्र, बार्टीच्या संशोधक उमेदवारांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बार्टीच्या ७६३ उमेदवारांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे आता सारथी, महाज्योती या संस्थेतीला संशोधक उमेदवार संतप्त झाले आहेत सोमवारपासून आंदोलन करण्यात येणार आहे, असे सारथी संस्थेतील संशोधक विद्यार्थी सौरभ शिदे यांनी सांगितले. शंभर टक्के शिष्यवृत्ती सारथी व महाज्योतीच्या संशोधक उमेदवारांनाही पाहिजे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे महाज्योतीच्या संशोधक तनुजा पंडित यांनी सांगतिले.
Comments are closed.