Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उताऱ्यावरील प्रश्नांचा सराव करा

Questions on given Paragraph

राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता २६ एप्रिल रोजी होणार आहे. सी सॅट पेपरमधील उताऱ्यावरील प्रश्न घटकाच्या सरावासाठी या लेखामध्ये प्रश्न देण्यात येत आहेत.

तीन कोटी भाषिकांच्या महाराष्ट्रात मराठी साहित्याला एकंदर वाचक किती आहेत? अत्यंत लोकप्रिय म्हणून गणल्या गेलेल्या लेखकांचे एखादे नवे पुस्तक प्रसिद्ध झाले, तर एक वर्षांमध्ये त्याच्या एक हजार प्रतीदेखील खपत नाहीत. मराठी दैनिकांचा किवा साप्ताहिकांचा पराकाष्ठेचा खप पन्नास हजाराच्या आत आहे. म्हणून मराठी साहित्याचे वाचक जास्तीत जास्त पन्नास हजार आहेत असे घटकाभर गृहीत धरले तरी महाराष्ट्रातल्या शंभर माणसात पुरता अर्धा माणूसदेखील मराठी साहित्याचा भोक्ता नाही असा त्याचा अर्थ होतो. साडेनव्याण्णव टक्के  मराठी जनतेला तुमच्या मराठी वाङ्मयाची काही एक माहिती नाही. आणि तुम्ही—आम्ही इथे जमून एकमेकांजवळ उगाच फुशारक्या मारतो की केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेमध्ये क्रांती केली आणि श्रीपाद कृष्णांनी विनोदाचा झेंडा फडकावला! बहुजन समाजाला वाङ्मय कळत नाही असे नाही! त्यांना रामायण ठाऊक आहे; महाभारत माहीत आहे; तुकाराम, नामदेव, जनाबाई यांचे अभंग त्यांना मुखोद्गत आहेत, ज्ञानोबांच्या ओव्या त्यांना कळतात; अन् विनोबांचे अक्षर न् अक्षर ते आवडीने वाचतात. पण आधुनिक मराठी साहित्यातले विषयही त्यांना समजत नाहीत अन भाषा तर मुळीच समजत नाही. कारण त्यातली पन्नास टक्के भाषा मुळी संस्कृतच असते. मराठी कुठे असते? ‘एका वेळी’ असे म्हणायच्या ऐवजी ‘एकसमयावच्छेदेकरून’ असे म्हटले म्हणजे सामान्य वाचक घाबरून पळत सुटेल नाही तर काय करील? सूर्य मावळण्याचा सुमार होता, पश्चिम दिशा लाल झाली होती. असे लिहिण्याऐवजी ‘भगवान सहस्ररश्मि आपल्या किरणसेवकांना घेऊन अस्ताचलावर उतरत होता आणि पश्चिमदिग्वधू आरक्त मेघाची भरजरी पैठणी अंगावर परिधान करून अपक्ष्म लोचनांनी त्यांच्या आगमनाची मार्गप्रतीक्षा करीत होती.’ असे लेखकाने लिहिले म्हणजे वाचकांच्या डोळ्यांपुढे सूर्याच्या  ऐवजी काजवे नाही चमकले तर काय नवल? अलंकारांचा अतिरेक आणि शब्दांची उधळपट्टी करण्याचा आमच्या साहित्यिकांना फार मोठा हव्यास आहे. जुन्या  सरंजामशाहीचाच हा एक अवशेष आहे. टॉलस्टॉय म्हणतो त्याप्रमाणे, भाषेत स्नायू असावेत, चरबी असूू नये. लेखकाने लिहावे कसे तर थोडके, नेमके आणि जोरके!

प्रश्न १  उताऱ्यातील शब्दांच्या पुढीलपैकी कोणत्या गटामध्ये समानार्थी शब्द समाविष्ट आहेत?

१) सूर्य, किरणसेवक, सहस्त्ररश्मी

२) पश्चिमदिग्वधू, अस्ताचल, पश्चिम दिशा

३) आरक्त, लाल, अपक्ष्म

४) मावळणे, अस्ताचल, आरक्त

प्रश्न २  लेखकाने आधुनिक मराठी साहित्याच्या कोणत्या वैशिष्टय़ांचा उल्लेख केला आहे?

अ.दुबरेधता

ब. संस्कृतचा प्रभाव

क. अलंकाराचा अतिवापर

ड. वाचकांची कमतरता

इ. कसदारपणा.

पर्यायी उत्तरे:

१) अ, ब, क आणि ड

२) ड आणि इ

३) ब, ड आणि इ

४) अ,  ब आणि क

प्रश्न ३  उताऱ्यामधील चर्चेच्या अनुषंगाने पुढील पर्यायापैकी कोणते विधान सुसंगत नाही?

१.       मराठी पुस्तकांचा खप लोकसंख्येच्या / वाचकांच्या मानाने कमी आहे.

२.       आधुनिक मराठी वाङ्मयाचा मराठी वाचकांमध्ये फारसा प्रसार झालेला नाही.

३.       संस्कृतच्या वापरामुळे मराठी वाङ्मयामध्ये भारदस्तपणा व कस निर्माण झाला आहे.

४.       अडीच कोटी मराठी भाषिक मराठी वृत्तपत्रे व नियतकालिके वाचत नाहीत.

प्रश्न ४  लेखकाच्या मते आदर्श साहित्याचे गुणधर्म कोणते आहेत?

अ. सुबोधता

ब. नेमकेपणा

क. वाचकप्रियता

ड.  अलंकारितकता

इ. कसदारपणा

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) ब, क आणि ड

३) अ, ब आणि इ

४) क, ड आणि इ

प्रश्न ५  ‘भाषेत स्नायू असावेत, चरबी असू नये’ या वाक्यातून टॉलस्टॉयला काय अभिप्रेत आहे?

अ. साहित्यामध्ये अलंकाराचा वापर जास्त असू नये.

ब.       भाषेमध्ये शब्दांचा अतिवापर असू नये.

१) अ आणि ब दोन्ही

२) अ किंवा ब दोन्ही नाही

३) केवळ  अ

४) केवळ  ब

प्रश्न ६ — पुढील विधानांचा विचार करा.

अ. आधुनिक मराठी वाङ्मयातील  विषय आणि भाषा यांमुळे बहुजन समाजाचे डोळे दिपून गेले आहेत.

ब. या लेखनाच्या माध्यमातून लेखकाने साहित्यिकांशी संवाद साधला आहे.

क. केशवसुत आणि श्रीपाद कृष्णांचे वाङ्मय सामान्य वाचकांना कळत नाही.

उताऱ्यामधील चर्चेतून वरीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील?

१) अ फक्त

२) ब फक्त

३) अ आणि क फक्त

४) अ, ब आणि क

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र. क्र१. योग्य पर्याय क्र.(२)

पर्याय १ मधील किरणसेवक हा शब्द वेगळा आहे. पर्याय ३ मधील अपक्ष्म हा शब्द वेगळा आहे. पर्याय ४मधील तीनही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे.

प्र.क्र.२. योग्य पर्याय क्र.(४)

प्र.क्र.३. योग्य पर्याय क्र.(३)

प्र.क्र.४. योग्य पर्याय क्र.(३)

वाचकप्रियता हा साहित्य चांगले असल्याचा परिणाम आहे. त्यामुळे त्यास आदर्श साहित्याचा गुणधर्म म्हणता येणार नाही.

प्र.क्र.५. योग्य पर्याय क्र.(१)

प्र.क्र.६. योग्य पर्याय क्र.(२)

डोळे दिपणे याचा अर्थ भारावून जाणे असा होतो. लेखकाच्या मते आधुनिक मराठी वाङ्मयातील शब्दयोजनेमुळे वाचकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकत असतील. म्हणजेच अशा भाषेचा वाचकांनी धसका घेतला आहे किंवा ते घाबरले आहेत असा अर्थ लेखकाला अभिप्रेत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड