बोर्डाचे बारावीचे अर्ज भरण्यास १ ऑक्टोबरपासून होणार सुरुवात!
Applications for the 12th Exam
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दि. १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. बारावीचे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रमाचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेणारे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांनी त्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालय प्रमुख यांच्यामार्फत https://mahahsscboard.in/ या संकेतस्थळाद्वारे भरायचे आहेत.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे. सरल प्रणालीद्वारेच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम, आयटीआयच्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीमध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित पद्धतीने ऑनलाइन भरायचे आहेत, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क भरणे, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख स्वतंत्रपणे आहीर करण्यात येणार असल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.