खुशखबर! लाडकी बहीणचे हप्ते पुन्हा सुरू- आज पासून वितरणाला सुरवात!
Ladki Bahin Payment December
विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी फायदेकारक ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या हप्त्याच्या वितरणास अखेर सुरुवात झाली आहे. नवनियुक्त महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केली. २४ डिसेंबरपासून लाभार्थीच्या बैंक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यास सुरुवात झाल्याचे आदिती यांनी सांगितले (Ladki Bahin Payment December Date). या योजनेतील पात्र दोन कोटी ३४ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना हप्ता देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही यासंदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अखेर आदिती यांनी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा मंगळवारी केली. याअगोदर गेल्या पाच महिन्यांत राज्यातील कोट्यवधी पात्र महिलांना साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. त्यानंतर आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आधारजोडणी राहिलेल्या १२ लाख ८७ हजार ५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७ लाख ९२ हजार २९२ पात्र महिलांना डिसेंबरचा सन्माननिधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे आदिती यांनी सांगितले.