महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
१. इ.१० वी व इ.१२ वी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कमी केला आहे काय?
- होय
- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये प्रथमच प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के कपात केलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. उदा. – नियमित विद्यार्थी (Regular), तुरळक (Isolated) विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, प्रथमच प्रविष्ट होणारे खाजगी विद्यार्थी, आय.टी.आयचे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे) Transfer of Credit साठी काही विषयांना प्रविष्ट होणारे विद्यार्थी.
- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये प्रविष्ट होणारे पुनर्परिक्षार्थी (Repeater), श्रेणीसुधार (Class Improvement Scheme) म्हणून प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना १०० % अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.
- २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमाचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
२. इ.१० वी दिव्यांग विद्यार्थ्यांना असणाऱ्या विषयाचा अभ्यासक्रम कमी केला आहे का ?
- होय.
- त्याचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३. कमी केलेला अभ्यासक्रम (प्रकरण) आम्हाला कळेल काय ?
- होय.
- याचा तपशील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
४. कमी केलेल्या अभ्यासक्रमावर (प्रकरण) प्रश्न विचारले जातील काय ?
- २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमाच्या मूल्यमापनाबाबत विषयनिहाय सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- सदर सूचना विचारात घेऊन प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
५. वेगवेगळ्या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील काय ?
- होय.
- मंडळाने विषयनिहाय निश्चित केलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या आराखड्यानुसार या परीक्षा घेण्यात येतील.
६. मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा यांचे गुण वार्षिक निकालात ग्राह्य धरले जातात काय?
- होय.
- मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व तत्सम परीक्षा यांचे गुण विषयनिहाय मूल्यमापन आराखडयानुसार मंडळाच्या अंतिम निकालात विचारात घेतले जाणार आहेत.
७. इ.१० वीसाठी प्रश्नपत्रिका आराखडा हा मागीलवर्षी सारखा असणार आहे काय ?
- होय.
- दि.०८ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार मंडळाने इ.१० वी व इ.१२ वीसाठी तयार केलेल्या मूल्यमापन आराखडयानुसारच प्रश्नपत्रिका असणार आहेत. यावर्षी यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
८. इ.१२ वीचा प्रश्नपत्रिका आराखडा यावर्षासाठी कसा असेल ?
- एप्रिल-मे २०२१ च्या परीक्षेपासून इ.१२ वीसाठी बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेला सुधारीत प्रश्नपत्रिका आराखडयानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत.
- सदर विषयनिहाय मूल्यमापन आराखडे मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
९. प्रश्नपत्रिका आरखडयासंदर्भात गुण विभागणी कशी असणार आहे.
- विषयनिहाय मूल्यमापन आराखडे मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- त्यामध्ये प्रश्ननिहाय गुणविभागणी तसेच घटकनिहाय गुणविभागणी दिली आहे.
१०.मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा बेस्ट फाईव्ह नुसारच निकाल जाहीर होणार काय?
- होय.
- निकालाच्या कार्यपद्धतीत याबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
११. इ.१० वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्याना नापास हा शिक्का गुणपत्रिकेवर मिळणार आहे काय?
- नाही.
- मंडळाच्या इ.१० वी व इ.१२ वीच्या परीक्षेला प्रविष्ट होऊन उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर शासन निर्णयानुसार अनुत्तीर्ण ऐवजी eligible for Re-exam असा शेरा नमूद करण्यात येत आहे.
१२. इतर सामाजिक संस्था /खाजगी संस्था यांच्याकडून घेतल्या जाणा-या संस्था/यंत्रणांकडून चित्रकला व इतर विषयांचे प्रस्ताव मंडळाकडे सादर केले तर चालते काय ?
- शासन निर्णयात विहीत केलेल्या कलांसाठी मान्यता प्राप्त संस्था/यंत्रणांकडून प्राप्त प्रमाणपत्रांसह सादर केलेल्या प्रस्तावांनाच इ.१० वीच्या मंडळाच्या परीक्षेमध्ये गुणपत्रिकेत अतिरिक्त गुण दिले जातात.
- अन्य सामाजिक संस्था/ खाजगी संस्था यांचेकडील प्रमाणपत्रांचा यासाठी विचार केला जात नाही.
१३. शासकीय चित्रकला विषयाचे प्रस्तावसंबंधित विद्यालय सादर करते का आम्ही वैयक्तिक सादर करावेत काय?
- मंडळाने विहित केलेल्या मुदतीत प्रथम विद्याथ्यांनी आपले प्रस्ताव त्यांच्या माध्यमिक शाळेत सादर करणे आवश्यक असते. तद्नंतर संबंधित शाळा विहित मुदतीत विभागीय मंडळाकडे सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित प्रस्ताव सादर करतात.
- विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या मंडळात प्रस्ताव सादर करता येत नाही.
१४. एसएससी बोर्ड स्वाध्याय पुस्तिका विद्यालयांना देणार आहे काय ?
- होय
- बालभारतीमार्फत इ.१० वीच्या खाजगी विद्यार्थ्यांना स्वंयअध्ययनासाठी मराठी २/३, इंग्रजी २/३, गणित भाग १ व २, इतिहास-राज्यशास्त्र, भूगोल या विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका तयार करण्यात आलेल्या आहेत.
- यावर्षी देखील या स्वाध्याय पुस्तिका खाजगी विद्यार्थ्यांना त्यांच्या संपर्क केंद्रामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
१५. परीक्षा केंद्रावर कोविड १९ विषयक सर्व सुविधा मिळतील काय ?
१६. परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर कधी उपस्थित राहावे व त्याबाबत मार्गदर्शक सूचना काय आहेत ?
- सद्यस्थितीत कोविड-१९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व अन्य घटकांना थर्मल गणव्दारे तापमान तपासून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
- त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी किमान एक ते ___ दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.
- विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात उपरोक्तप्रमाणे थर्मल गनव्दारे स्वतःचे तापमान तपासल्यानंतर प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान ३० मिनीटे अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न होणे आवश्यक आहे.
- उदा. सकाळ सत्रात सकाळी १०.३० च्या पेपरसाठी सकाळी१०.०० वाजता परीक्षा कक्षात स्थानापन्न व्हावे.
१७. परिक्षेची बैठक व्यवस्था सर्वसाधारण कशी असू शकेल?
१८. परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनीट अगोदर प्रश्नपत्रिका मिळेल काय ?
- होय
- प्रथम सत्रातील सकाळी १०.३० वा.सुरु होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका सकाळी १०.२० वाजता तसेच दुसऱ्या सत्रातील दु.३.०० वाजता सुरु होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका दु.२.५०वाजता परीक्षाकक्षातील विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
१९. परीक्षाकाळात बैठक व्यवस्था अचानक बदलू शकते काय?
- नाही
- सर्व साधारण परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा काळातील बैठक व्यवस्था अचानक बदलण्यात येत नाही.
- मात्र प्रचलित पध्दतीने विषयनिहाय बदलावी लागणारी बैठक व्यवस्था विद्यार्थ्यांना किमान १ दिवस अगोदर अवगत करण्यात येते.
- त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यावर घरी जाताना पुढील पेपरच्या बैठक व्यवस्थेसंदर्भात काही सूचना आहे काय याची माहिती घेण्यासाठी परीक्षा केंद्र/ उपकेंद्रावरील सूचना फलकांचे वाचन करावे.
२०. विषयामध्ये काही अडचणी/शंकाअसल्यास तज्ज्ञ विषय शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल काय?
- होय
- विषयांबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी/शंका असल्यास त्यांनी प्रथम आपल्या शाळेतील संबंधित विषय शिक्षकाशी संपर्क साधावा.
- अपवादात्मक परिस्थितीत विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता भासल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर विषयनिहाय तज्ज्ञ शिक्षकांची यादी व संपर्क कमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
२१.श्रेणी विषयाची कार्यवाही /ग्रेड कसे दिले जाणार आहे?
- श्रेणी विषयांसाठी विषयनिहाय मूल्यमापन आराखडा तयार करण्यात आला आहे.
- शाळा स्तरावर सदर आराखडयानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन गुण दिले जातात. तद्नंतर सदर गुणांचे निर्धारित श्रेणीत रुपांतर करुन सदर श्रेणी मंडळास कळविली जाते.
- ही श्रेणी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत नमूद करण्यात येते.
२२. चित्रकला परीक्षा यावर्षी रद्द केलेल्या आहेत. त्यासंदर्भात मागील एलिमेंटरी व इंटरमिजीएटच्या आधारावर गुण दिले जाणार आहे का ?
- शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत एलिमेंटरी परीक्षेसह इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी परीपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर अतिरिक्त गुण देण्यात येतात
- सदर परीक्षा विद्यार्थ्याने कोणत्याही इयत्तेत उत्तीर्ण केला असल्यास वरीलप्रमाणे गुणदान करण्यात येते.
२३. परीक्षा काळात दिव्यांग विद्यार्थ्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
- दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या विहित प्रस्तावाव्दारे केलेल्या मागणीनुसार व विभागीय मंडळाच्या मान्यतेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येतील.
२४. बोर्डाचे अधिकृत वेळापत्रक कोणत्या वेबसाईटवर मिळू शकेल ?
- मंडळाचे अधिकृत वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. मात्र ही सुविधा फक्त माहितीसाठी आहे.
- परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरुन खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे.
- अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राहय धरु नये.
१.माझा अभ्यास झालेला नाही? त्यामुळे परीक्षेची भिती वाटत आहे.
- काही हरकत नाही. परीक्षेसाठी अजून भरपूर वेळ आहे. यापुढे अभ्यासाला सुरुवात केलीस तरी तुझा अभ्यास व्यवस्थित होईल.
- विषयनिहाय अभ्यासाचे दैनंदिन वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अभ्यास करावा.
२.मला ऑनलाईनमध्ये काहीही समजले नाही ?
- प्रत्यक्ष किंवा फोनव्दारे शिक्षकांशी संपर्क करुन अभ्यासविषयक शंका विचारुन त्याचे निरसन करुन घ्या.
३.माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे मला ऑनलाईन शिकविलेले समजले नाही ?
- पाठयपुस्तकाचे सखोल वाचन करावे आणि त्यामध्ये येणारे समस्यांसंदर्भात प्रत्यक्ष किंवा फोनव्दारे शिक्षकांशी संपर्क | करुन अभ्यासविषयक शंका विचारुन त्याचे निरसन करुन घ्या.
४.कोरोना काळामुळे लिखाणाची सवय कमी झाली आहे. लिखाणाचा वेग कमी झाला आहे.
- रोज अर्धा ते एक तास दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे, निबंध, पत्र लेखन तसेच नमुना प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविल्यास लिखाणाचा वेगही वाढेल आणि अभ्यासही होईल.
५.माझ्या स्मरणात/ लक्षात राहत नाही.
- स्मरणात राहण्यासाठी पाठय पुस्तकाचे दोन- तीन वेळा वाचन करावे. वाचन करताना महत्वाचे शब्द, मुद्दे अधोरेखित करावे तसेच त्या भागाचे टिपणही काढावे.
- वाचलेला व टिपण काढलेला भागाचे काही वेळानंतर स्मरण करावे. त्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहील व आत्मविश्वासही वाढेल.
६.मला इ.९ वी मध्ये फक्त ३८ टक्के गुण होते. यावर्षी मला नापास होण्याची भीती वाटते.
- कोणतेही दडपण मनावर घेऊ नकोस, प्रश्नपत्रिका आराखडा समजून घे प्रत्येक विषयाच्या सोप्या-सोप्या भागाचा अभ्यास कर.
- स्वयंअध्ययनावर अधिक भर दे, नक्की पास होशील.
७.मला दरवर्षी साधारणत: ९० टक्केच्या पुढे गुण मिळतात परंतू यावर्षी मला कमी गुण मिळण्याची भिती वाटते.
- परीक्षेची भीती बाळगू नये. नमुना प्रश्नपत्रिका वेळ लाऊन सोडविण्याचा प्रयत्न कर. सराव करत रहा. आलेल्या शंकाचे निरसन करुन घे.
- अभ्यासामध्ये सातत्य, चिकाटी व जिद्द ठेवावी.
- परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. नक्कीच ९० टक्केच्या वर गुण मिळतील.
८.माझ्याकडे मोबाईल नाही तसेच अजून आम्ही गावीच आहोत. मी शाळेत फक्त फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो.माझा अभ्यास होईल का?
- तुझ्याकडे पाठयपुस्तके असतीलच. स्वयं अध्ययनावर भर दे.
- तुझ्या परिसरातील शाळेत येण्याची परवानगी घे. अभ्यासाचे विषयनिहाय नियोजन कर. निश्चितच तुझा अभ्यास होईल.
९.पेपर लिहिताना वेळ कमी पडतो.
- परीक्षापूर्वी नमुना प्रश्नपत्रिका वेळ लाऊन सोडविण्याचा सराव कर. उत्तरपत्रिका वेळेत लिहिणे महत्वाचे आहे.वेळेचे नियोजन कर.
१०.माझ्या बारावीच्या लेखी परीक्षा दरम्यान जेईई परीक्षा आहे काय?
- होय, तथापि, जेईई परीक्षा कालावधीमध्ये विज्ञान विषयाचे पेपर ठेवण्यात आलेले नाहीत. यासाठी एसएससी बोर्डाने जाहीर केलेले वेळापत्रक तपासून घे.
११.कोविड १९ परिस्थिीतीमुळे पालक मला परीक्षेस बसू देत नाही. मला परीक्षा द्यावयाची आहे.
- कोविड १९ परिस्थिती विचारात घेवून परीक्षा मंडळामार्फत परीक्षा केंद्रावर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांना याबाबत माहिती द्यावी. परीक्षेला गैरहजर राहू नये.
१२.मला गणित आणि इंग्रजी विषयाची भिती वाटते त्यामुळे झोप लागत नाही.
- सर्व प्रथम विषय शिक्षकांशी चर्चा करुन विषयाची भीती घालवावी. स्वत:वर विश्वास ठेव. ज्या बाबींमध्ये मन लागते त्या गोष्टी प्राधान्याने कर. प्रश्नपत्रिका समजावून घेऊन सोपा भाग पुर्ण कर. समजलेल्या बाबी लिहून घे. रोज चिंतन मनन कर.
- उत्तीर्णतेसाठी अभ्यासाची तयारी कर. त्यामुळे मनावरील परीक्षेचे दडपण आणि मानसिक ताणतणाव कमी झाल्याने मन शांत राहील व झोप लागेल.
१३.अभ्यास करताना मला झोप येते, माझे पोट दुखते, डोके दुखते तर मी काय करु.
- जर तुम्हाला कठिण वाटणारा विषय अभ्यासत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्या विषयाची अभ्यासाची वेळ बदलायला हवी. तुमचा अभ्यास कोणत्या वेळी छान होतो. त्यावेळेनुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार कर.
- ज्यावेळेला तुम्हाला झोप येते. त्यावेळी लेखन करुन किंवा नोट्स काढणे अशाप्रकारे अभ्यासात बदल कर. अभ्यास करताना सतत पोट किंवा डोके दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घे.
१४.मला अभ्यास करु वाटत नाही परीक्षा काळात अभ्यासाची तंत्रे सांगा
- प्रथम तुझे ध्येय निश्चीत कर. कोणतेही ध्येय साध्य करीत असताना आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहे. जर आपल्याला परीक्षेत उत्तम गुण मिळवयाचे असतील तर आपल्याला नियमितपणे अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी स्वत;चे अभ्यासाचे वेळापत्रक बनव. वेळापत्रकानुसार अभ्यासाला सुरुवात कर.
- परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासाचे व वेळेचे नियोजन करावे. अभ्यासक्रमातील जो भाग कठिण वाटतो त्या भागाचे सखोल वाचन करुन त्या भागाचे टिपण काढावे. आनंदी वृत्तीने परीक्षेला सामोर जावे. यश नक्कीच मिळेल.
१५.घरातील टि.व्ही. व घरातील व्यक्तींच्या गप्पांमुळे अभ्यासात मन लागत नाही.
- आपले लक्ष्य परीक्षा आहे हे कायम लक्षात ठेवावे. काही मिळवयाचे असेल तर आपल्याला काही सोडावे लागणार आहे.
- यासाठी घरातील टि.व्ही. व व्यक्तिंच्या गप्पा याकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी.
१६.ऑनलाईन अभ्यास करता करता मोबाईल वर गेम खेळण्याचे व्यसन लागले आहे. त्यातून बाहेर कसे पडावे.
- मोबाईल वरील गेम खेळून बहुमुल्य वेळ वाया घालू नये. परीक्षा कालावधी जवळ आला आहे त्यामुळे पाठयपुस्तकांचा अभ्यास कर.