१२ वी नंतर फाईनआर्ट मधल्या संधी

What after 12th Exam? Opportunities in the visual arts

दृश्यकला आणि दृश्य उपयोजित कलेचं समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतामध्ये ही कला प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे. देशातीलच उदाहरण घ्यायचं झाल्यास अंजिठ्याच्या लेण्यांमधील चित्रकला मानवी संस्कृतीचा इतिहास दर्शवते. वेरुळमधील शिल्पकला आजही मन मोहून टाकते. दृश्यकलेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये चित्रकला (पेंटिंग) आणि शिल्पकला यांचाच समावेश होता. मानवाच्या विकासाबरोबरच कलेचा विकास आणि विस्तार होत गेला. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान जगात तर दृश्यकलेचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालं आहे. चित्रपटांच्या स्पेशल इफेक्टपासून ते मोबाइल अॅपच्या रचनेपर्यंत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांची ओळख तसंच त्याविषयीच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती या लेखातून घेऊ या…

० दृश्यकला (फाइन आर्ट)

दृश्यकलेमध्ये सहा प्रमुख विभाग पडतात. यामध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्टसचे चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम खालील विषयांमध्ये उपलब्ध आहेत.
चित्रकला (पेंटिंग)- या अभ्यासक्रमामध्ये पोर्टेट, प्रिंट मेकिंग, पेंटिंग, म्युरल (भित्तीचित्रे-द्विमितीय वा त्रिमितीय) यामध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अभ्यासक्रमामध्ये चित्रकलेचा इतिहास, शरीरशास्त्र, पेंटिंग्जचे तंत्रज्ञान, रंगाचे ज्ञान आणि रंगांच्या विविध माध्यमांचा अभ्यास केला जातो. स्थिर चित्रं, चेहऱ्याचा अभ्यास, सौंदर्यशास्त्र, प्लॅस्टरच्या मॉडेलवरुन चित्र काढणं, मॉडेल पाहून चित्र काढणं, परस्पेक्टिव्ह, स्मरणचित्र आदी विषयांचा अभ्यास केला जातो. अॅनिमेशन, पोर्टेट पेंटिंग, रेखाचित्रे आणि इलेस्ट्रेशनमध्ये काम करु शकतात. सेट डिझायनिंग आणि कला दिग्दर्शनामध्ये काम करता येतं.

– शिल्पकला- शिल्पकलेच्या अभ्यासामध्ये शिल्पकलेचा इतिहास, शरीरशास्त्राचा अभ्यास (अवयवांची प्रमाणबद्धता), नैसर्गिक आणि मानवनिर्मित डिझाइन बनवणं, सृजनशील शिल्पं तयार करणं आणि व्यक्तिशिल्प, स्मारकशिल्प आदी विषयांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे विविध माध्यमं वापरून शिल्प बनवण्याचं प्रशिक्षणही यामध्ये दिलं जातं. यामध्ये माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, सिपोरेक्स, दगड, धातू, फायबर ग्लास, संमिश्र माध्यमं (लेदर, अ‍ॅक्रलिक आणि अन्य माध्यमांचा एकत्रित उपयोग करून निर्मिती करणं) आदींचा समावेश असतो. सौंदर्यशास्त्राचादेखील या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. रिअॅलिस्टिक पद्धतीचं शिक्षण हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचं वैशिष्ट्य आहे. अलीकडे नवश्रीमंत वर्गामध्ये आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये शिल्पांचा इंटीरिअरसाठी वापर केला जातो. याबरोबरीनेच चौकातील शिल्पं तसेच स्मारक शिल्पं यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चित्रपटाच्या सेट डिझायनिंगमध्ये आणि स्टुडिओमध्येसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत. शोरूम्स आणि मॉल्समध्येदेखील शिल्पांना चांगली मागणी आहे. याबरोबरीनं थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये पात्रांना तयार करण्यासाठी शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे अ‍ॅनिमेशन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ अलीकडे शिल्पकलेकडे वाढला आहे.

– इंटिरिअर डेकोरेशन- फर्निचर डिझाइन, सेट डिझायनिंग, प्रॉडक्ट डिझायनिंग असे स्पेशलायझेशन पदव्युत्तर पदवीमध्ये करता येतं. पदवी अभ्यासक्रमामध्ये या सर्वच विषयांची ओळख करुन दिली जाते. दृश्यकलेच्या अन्य अभ्यासक्रमांप्रमाणेच या अभ्यासक्रमामध्ये कलेचा इतिहास, डिझाइन, रंग, ड्रॉइंग, स्मरणचित्रे आदी विषयांचा समावेश आहे. बरोबरीनेच फर्निचर डिझाइन, व्हिजव्हलायझेशन, संगणक या विषयातील प्रात्यक्षिक तसेच सैध्दांतिक अभ्यास देखील केला जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बहुतेक विद्यार्थी हे इंटिरिअर डेकोरेशनचा स्वत:चा व्यवसाय सुरु करतात. निवासस्थाने, हॉटेल्स, कार्यालये, शॉपिंग सेंटर्स, मॉल यांची गरजेनुसार अंतर्गत सजावट हा सध्याच्या काळात एक आकर्षक व्यवसाय आहे.

– सिरॅमिक्स- मातीपासून विविध भांडी आणि शोभिवंत वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिलं जातं. मातीच्या भांड्यांना आणि सिरॅमिक्सना धातूंसारखी लकाकी देऊन, त्यावर सुंदर रंगकाम करून त्यापासून शोभिवंत वस्तू बनवता येतात. तसंच यामध्ये क्रॉकरी डिझाइन, टाइल्स डिझाइन, स्वयंपाक घरातील तसंच बाथरुममधील विविध सिरॅमिक्सच्या वस्तूंचे डिझायनिंग शिकवलं जातं. स्वत: पॉटरी डिझायनिंगचा व्यवसायदेखील करणारे अनेक जण आहेत.

– मेटल वर्क- या अभ्यासक्रमामध्ये ज्वेलरी डिझायनिंग, कॉइन डिझायनिंग संबंधित विषयांचा समावेश होतो. पत्र्यांवरील रंगकाम (एनॅमलिंग) आणि धातूच्या पत्र्यावर ठोककाम (एम्बॉसिंग) करुन डिझाइन करणं आदींचा समावेश होतो. यामध्ये पारंपरिक मीना वर्कमधील कामाचा अभ्यास केला जातो. उदा. मंदिरावरील धातूच्या महिरपींचं डिझाइन, धातूंमधील कोरीव आणि उठाव काम करणं. तसंच अन्य विषयांचा देखील समावेश असतो. उदा. मेटल वर्क्सचा इतिहास, डिझायनिंग आणि ड्रॉइंगचे विषय, प्रिंट मेकिंग, एनॅमल डिझाइन (Enamel Design), रिपॉसे डिझाइन (Repousse Design) आणि उपयोजन. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी हे प्रामुख्यानं ज्वेलरी डिझायनिंगकडे वळताना दिसतात. धातूंमधून शिल्पकला, शोभिवंत वस्तू तयार करणं, म्युरल तयार करणं याप्रकारची कामं या अभ्यासक्रमातील विद्यार्थी करतात. विविध कामांसाठी डाय तयार करणं, ट्रॉफीज आणि पदकं तयार करण्यासाठी, टाकसाळीत नाणी बनवण्यासाठी देखील मेटल वर्क्स उपयोग होतो.

– टेक्सटाइल डिझाइन- कपडा तयार करण्याची प्रक्रिया आणि कपड्याचं डिझायनिंग देखील शिकवलं जातं. कपडा प्रत्यक्षात कसा तयार होतो याचं प्रशिक्षण मागावर (लूम) दिलं जातं. या विषयातील विद्यार्थी टेक्सटाइल उद्योगामध्ये डिझाइनर म्हणून काम करतात. डिझायनिंगमध्ये संगणकीय प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव केलेला असतो.

या अंतर्गत येणारे अभ्यासक्रम आणि उपलब्ध असलेल्या कॉलेजांची माहिती पुढच्या लेखात घेऊ या.

सौर्स : मटा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप