लालपरी! राज्यातील पहिली एसटी एक्काहत्तरीत

Lalapari! First ST Bus completed seventy one years

साक्षीदार ठरले अहमदनगर शहर. कारण ही घटना या शहरात घडली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्ष पूर्ण होण्याच्या आतच, म्हणजेच एक जून १९४८ रोजी नगरमधील माळीवाडा परिसरातून नगर ते पुणे अशी पहिली प्रवासी बस सुरू झाली. राज्यातील एसटीची ही प्रवासी सेवा या माध्यमातून ऐतिहासिक नगर शहरातून सुरू झाली. कालौघात दळणवळणाच्या क्षेत्रात मोठे बदल झाले. परिणामी महामंडळाचे प्रवासी कमी होत आहेत. असे असले तरी सुरक्षित प्रवासासाठी नागरिक अजूनही एसटीलाच प्राधान्य देतात. त्यामुळे एसटीचे नाते नगर शहराशी कायम जोडले गेले आहे…

राज्यातील पहिली एसटी बस १९४८ मध्ये नगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. त्या काळी नगर शहर फार लहान होते. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक असे नव्हतेच. खासगी बस माळीवाडा परिसरातून बाहेरगावी जात असत. याच परिसरातून पहिली बस पुण्याकडे मार्गस्थ झाली. विशेष म्हणजे या बसचे पहिले चालक किसन राऊत आणि पहिले वाहक लक्ष्मण केवटे हे दोघेही नगरचेच. हाही एक योगायोगच म्हणावा लागेल. यामुळे या पहिल्या बसला नगरी ओळख मिळाली होती. त्या काळी नगर शहरात वाहतुकीची काहीच साधने नव्हती. लोक सायकल वा टांगा याद्वारे प्रवास करीत. चारचाकी व दुचाकी वाहने क्वचितच दिसायची. बाहेरगावी जायचे म्हटले, तरी प्रवासाची साधने फारशी नसायची. नगर शहराजवळील मोठे शहर पुणे हेच होते. त्यामुळे नगरमधील नागरिक रोजगार व शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला जात असत. अर्थात आजही नगरहून अनेकजण रोजगार व शिक्षणासाठी पुण्याला जातात; पण त्या काळात नागरिकांना प्रवास करण्यासाठी सरकारने बससेवा सुरू केल्याने याबाबत नागरिकांत कुतूहल होते. बस कशी दिसते हे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी होत असे. पहिल्या बसची बनावट आजच्यासारखी लोखंडी नव्हती, तर लाकडी होती. बसवर छप्पर लाकडी होते. या बसची आसनक्षमता तीस प्रवासी इतकी होती. सकाळी आठ वाजता बस नगर येथून पुण्याकडे निघाली होती. त्या वेळी तिकिटाचे दर पाहिले, तर आज आपल्याला नवल वाटेल; पण त्या काळी त्या पैशांनाही किंमत होती. त्या वेळी नगर ते पुणे या साधारण सव्वाशे किलोमीटर अंतरासाठी फक्त अडीच रुपये तिकीट होते. बसस्थानकातून बस बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिक उभे होते. काही जणांनी तर या बसचे पूजनदेखील केले. नगर ते पुणे दरम्यान अनेक छोटी गावे येतात. या गावातील नागरिकही बस पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करीत होते. त्या काळी खेडेगावात चारचाकी वाहने नसायची. त्यामुळे नागरिकांना बसचे अप्रुप वाटायचे. या मार्गावरील चास, सुपे, शिरूर, लोणीकंद या गावात लोक रस्त्याच्या कडेला उभे असत. बस गावात आली की जल्लोषात स्वागत केले जायचे; तसेच गावात बसचे पूजन केले जात होते, असे महामंडळातील जुने कर्मचारी सांगतात.

एसटी महामंडळाकडून प्रवासीवाढीसह विविध विषयांबाबत अनेक योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, असे असले तरी यामध्ये आता नगरचा विचार क्वचितच होतो. आता बदलत्या काळात प्रवासाची अनेक साधने आहेत; पण बदलत्या काळात महामंडळही बदलले आहे. साधी लाकडी बस जाऊन त्यानंतर मिडी बस, निमआराम बस, शिवनेरी बस, शिवशाही बस अशा बस महामंडळाच्या ताफ्यात आल्या. महामंडळात एक लाख कर्मचारी आहेत. महामंडळाच्या सतरा हजार बसमधून रोज सत्तर लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. आज महामंडळाचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. ज्या गावात रस्ता नाही अगदी अशा गावातही एसटी जाते. महामंडळ तोट्यात असतानाही प्रवाशांची गैरसोय नको म्हणून काही ठिकाणी बससेवा सुरू आहे. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटीचे अस्तित्व हरवत चालले आहे. हक्काचा प्रवासी दूर जात आहे. तोटा वाढत चालला आहे. नव्वदच्या दशकात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार चांगले मिळत होते. त्यामुळे अनेकजण अन्य सरकारी नोकऱ्या सोडून महामंडळात आले. आता मात्र तशी स्थिती राहिलेली नाही. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत होत आहे. प्रवासी कमी होत आहेत. इंधनाचा खर्च व अन्य खर्च वाढला आहे. त्यामुळे महामंडळाच्या अडचणीही वाढल्या आहेत. ७१ वर्षांपूर्वी नगर शहरातून मोठ्या दिमाखात सुरू झालेला एसटीचा प्रवास आता मात्र अडचणींच्या मार्गावरून सुरू आहे.

पहिला पगार ८० रुपये

नगर ते पुणे या बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे होते. केवटे जेव्हा महामंडळात भरती झाले, त्या वेळी त्यांना ८० रुपये पगार मिळत होता. पुढे त्यांना दीडशे रुपयांपर्यंत पगार मिळत होता.

शहर बस नको रे बाबा…

काही वर्षांपूर्वी महामंडळामार्फत नगरमध्ये शहर बस चालवल्या जात होत्या. नंतर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महामंडळाने बससेवा महापालिकेकडे हस्तांतरित करून तसा ना हरकत दाखला महामंडळाने दिला होता. एकदा शहरांतर्गत बससेवा बंद केल्यानंतर पुन्हा तेथे बस सुरू करण्याचा विचार महामंडळाकडून केला जात नाही. मध्यंतरीच्या काळात महापालिकेची शहर बससेवा बंद पडली होती. त्यामुळे महापालिकेने महामंडळाला प्रस्ताव पाठवून शहरात पुन्हा बससेवा सुरू करावी, अशी विनंती केली होती. येथील वाहतूक आणि तोट्याचा अनुभव विचारात घेता महामंडळाने या प्रस्तावावर काहीच कार्यवाही केली नाही. महामंडळाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून महापालिकेनेही नंतर हा विचार सोडून दिला.

हे माहीत आहे का?

  1. पहिली बस : नगर ते पुणे १ जून १९४८
  2. तेव्हाचे नगर ते पुणे तिकीट : अडीच रुपये
  3. पहिल्या बसची आसनक्षमता : ३० प्रवासी
  4. पहिली बस : लाकडी, बेडफोर्ड कंपनीची

हवाय तुमचाही सहभाग

जुन्या अहमदनगर शहराची सफर घडवून आणणाऱ्या ‘माझे अहमदनगर’ या उपक्रमात आम्हाला तुमचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. तुमच्या जुन्या आठवणी, अनुभव किंवा वेगळी माहिती आम्हाला उचित छायाचित्रांसह [email protected] या ई-मेलवर पाठवा. यातील निवडक मजकूर या सदरात समाविष्ट केला जाईल.

सौर्स : मटा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Naman Manoj Nagpurwar says

    ITI tred ICTSM YA TRED CHE JAGA PATVA

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप